सुरेश फरांडेनी पाठवलेली एक छान कविता.
******* 🕊 ******
*निरोप*
झाडावर स्वच्छंद विहरणाऱ्या
चिमणीला बघून...
आज मानवाला
आलंं भरुन!
मुक्त ती ह्या जगात
अन् बंदिस्त मी माझ्याच घरात?
होताच नजरानजर,
चिमणी ही आली खिडकीवर.
_“काय रे बाबा,_
_काय झालंय तरी काय?_
_दोन दिवस बघत्ये_
_कुणीच घराबाहेर पडत नाय!_
_ईवलासा जीव आमचा_
_जायचा घाबरुन,_
_कर्णकर्कश्य आवाजाने_
_उडायचो दचकून..._
_पण आता आमचाच चिवचिवाट_
_येतो ऐकायला,_
_खूप छान वाटतंय रे_
_स्वच्छ हवेत उडायला..._
_पण जग जिंकायला निघालेला_
_तू हताश का रे झालास?_
_स्वत:च्याच घरात बंदिवान झालास?”_
?
?
?
“काय आणि कसं सांगू तुला चिमणे,
अवघडच झालय गं आता जगणे!
विज्ञानाची धरुन कास,
जग जिंकण्याची होती आस
ईर्षा होती मनात
चढला होता माज,
पृथ्वी फक्त आपलीच,
आपणच करु राज...!
डोंगर फोडून, तळी बुजवून
निर्सगाचा केला ऱ्हास,
वाटलंच नव्हतं होऊ शकेल
कधी असाही त्रास!
मायेच्या स्पर्शाला लोटुन दूर,
रमलो आभासी जगात,
पैश्यामागे धावताना
जगत होतो भ्रमात...
आमच्या चुकीची शिक्षा
आता आम्ही भोगतोय,
न दिसणारा एक सुक्ष्म विषाणू
मानवालाच संपवतोय!
सारं जग झालंय हतबल
त्याच्या अस्तित्वाने
बंदिस्त केलंय आम्ही स्वत:ला
घरात नाईलाजाने.
केवळ स्पर्शाने निघालाय तो
मानवाला संपवायला,
घाबरलोय आम्ही आता
कुणालाही स्पर्श करायला
दुरूनच करतो आता
सगळ्यांची काळजी,
असो नातवंड की
आजोबा आणि आजी
अंगठ्याच्या स्पर्शाने जग
आलं होतं आमच्या मुठीत
पण आसुसलंय मन आता
घेण्या जिवलगांना मिठीत...!
चिमण्या पाखरा जा रे...
निरोप दे माझ्या जिवलगांना,
काळजी घ्या रे स्वत:ची
महत्त्व द्या केवळ सुरक्षित जगण्याला...
*केवळ सुरक्षित जगण्याला!”*
******* 🕊 *******